नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ३० नोव्हेंबरच्या संसदेच्या विशेष सत्रात आणल्या जाणार्या संभाव्य परिसीमन विधेयकावरून देशातील राजकीय घडामोडींना वेग येत आहे. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मार्ग सुकर करण्याच्या उद्देशाने आणण्यात येणार्या संविधान (१३२ वी दुरुस्ती) विधेयक, २०२६ यासह तीन महत्त्वाची विधेयके सोमवारी लोकसभेत मांडण्यात येणार आहेत. द्रमुक, शरद पवार गट, वायएसआरसीपी, बीआरएस या पक्षांनी विधेयकांना पाठिंबा जाहीर केल्याचे वृत्त आल्यानंतर या विधेयकाला पाठिंबा देऊ नये, यासाठी शरद पवार आणि द्रमुक यांची समजूत काढण्यासाठी आता खुद्द सोनिया गांधी मैदानात उतरत आहेत. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत विधेयक पस व्हावे यासाठी सरकारकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान याबाबतचे अधिक वृत्त असे की, परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचा फेरविचार करावा, यासाठी विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची चेन्नईत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात ममता बॅनर्जी यांच्यासह काही विरोधी पक्षांचे नेते आणि काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, द्रमुकने २८ नोव्हेंबर रोजीच आपल्या खासदारांच्या बैठकीनंतर विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली आहे. तर शरद पवार यांच्या पक्षानेही सर्व राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये समान ५० टक्के वाढीची अट घालत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची मनधरणी करण्याचे आव्हान काँग्रेससमोर उभे राहिले आहे.
दुसरीकडे, कोणत्याही परिस्थितीत विधेयकाला आवश्यक पाठिंबा मिळविण्यासाठी केंद्र सरकारनेही राजकीय पातळीवर हालचाली वाढवल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने २७ नोव्हेंबर रोजी संबंधित विधेयकांना मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी द्रमुक आणि वायएसआर काँग्रेसच्या खासदारांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली आहे. प्रस्तावित विधेयकानुसार लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमध्ये ५० टक्के वाढ करून सदस्यसंख्या ८१६ पर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. याच प्रक्रियेशी ३३ टक्के महिला आरक्षणाची अंमलबजावणी जोडण्यात आली आहे. विशेष म्हणजे, द्रमुकने तामिळनाडूच्या लोकसभा जागा ३९ वरून ५९ करण्यासह पुढील २५ वर्षांसाठी राज्यांचे प्रतिनिधित्व सुरक्षित ठेवण्याच्या तरतुदीला महत्त्व दिले आहे. बीआरएसनेही तेलंगणाच्या जागा १७ वरून २६ होण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मात्र, काँग्रेससह समाजवादी पक्ष आणि डाव्या पक्षांनी या विधेयकाला विरोधाची भूमिका घेतली आहे. महिला आरक्षण लागू करण्यासाठी लोकसभेची सदस्यसंख्या वाढविण्याऐवजी विद्यमान ५४३ जागांमध्येच आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी विरोधकांची मागणी आहे. तसेच २०२७ च्या जनगणनेनंतर निष्पक्ष परिसीमन प्रक्रिया राबवावी, असा आग्रह राहुल गांधी यांनी धरला आहे. दुसरीकडे, सरकारच्या प्रस्तावाला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असल्याने प्रत्येक खासदाराचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपासून ३ डिसेंबरपर्यंत चालणारे संसदेचे विशेष अधिवेशन केवळ विधेयकांच्या चर्चेपुरते मर्यादित न राहता सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय ताकदीचीही परीक्षा ठरणार आहे.